वसंतनगरचा ग्रामसेवक निलंबित, बिडीयोची कारवाई; चौकशी सुरू

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतनगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष ग्रामपंचायतला भेट दिली. भेटीत ग्रामसेवक हे गैरहजर आढळून आले. परिणामी इतर तक्रारी पाहता गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी ग्रामसेवक यांचे चौकशी कार्यकाळ पर्यंत निलंबित केले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामसेवक विजय न्याहळदे यांच्याविरोधात ग्रामस्थ काशिनाथ जाधव यांनी पंचायत समितीला एक तक्रार केली होती. ग्रामसेवक न्याहळदे हे ग्रामपंचायतीवर न येता गैरहजर राहतात. राष्ट्रीय पेयजल योजनाचे संपूर्ण दस्तऐवज उपलब्ध करून देण्यास हाय गय व टाळाटाळ करतात अशी तक्रार केली होती. तक्रारीची आयपीएस अधिकारी तथा गटविकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी दखल घेऊन ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. भेटीत ग्रामसेवक हे गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेचे कागदपत्र उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी हायगय केली असल्याचे निदर्शनास आले. याव्यतिरिक्त काही ग्रामस्थांनी देखील गट विकास अधिकारी गुप्ता यांच्याकडे इतरही तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींची तात्काळ दखल घेत गट विकास अधिकारी शुभम गुप्ता यांनी ग्रामसेवक विजय न्याहळदे यांना प्रथमदर्शनी दोषी मानून त्यांना कारणे द्या नोटीस दिली होती. परंतु ग्रामसेवक कडून समाधानकारक खुलासा सादर झाला नाही. परिणामी गटविकास अधिकारी गुप्ता यांनी वरिष्ठांचे आदेश अवमान करणे, कर्तव्यात कसूर करणे व संपूर्ण दप्तराची चौकशी होईपर्यंत ग्रामसेवक न्याहाळदे यांचे निलंबन केले आहे.

या काळामध्ये ग्रामसेवक यांचे मुख्यालय हे पंचायत समिती राहील असे निर्देशीत केले आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांच्या तक्रारीची आयपीएस अधिकारी गुप्त यांनी दखल घेतल्याने पंचायत समिती अंतर्गत कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये मात्र चांगलीच भीती निर्माण झाली आहे संबंधित ग्रामसेवकाची सहाययक गटविकास अधिकारी यांच्या पथकामार्फत चौकशी ही सुरू आहे.

 

Protected Content