फत्तेपूर येथे पोलीस कर्मचाऱ्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडे बाजारात सुरू असलेल्या फळांचे दुकान बंद करण्याचे सांगितल्याच्या रागातून दुकानदारासह इतरांनी पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्यची घटना फत्तेपूर येथे उघडकीला आली. याप्रकरणी पहूर पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, कोरोना महामारी रोखण्यासाठी नियमांच्या अधिन राहून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने लावण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ११ वाजेनंतर दुकानांवर कारवाई केली जाते. दरम्यान जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील आठवडे बाजार व बसस्थानक समोर फळाचे दुकान सुरू होते. यावेळी पहूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी पोहेकॉ अनिल सुरवाडे यांनी दुकान बंद करण्याचे सांगितले असता दुकानदार युसूफ शब्बिरखा पठाण याला राग आल्याने पोलीस कर्मचारी सुरवडे याला कानशिलात लगावली. पठाण सोबत असलेले अरशद युसुफ पठाण, मेहमुदखॉ शब्बीरखॉ पठाण, एजाज मेहमुद पठाण आणि मोहसीन मेहमुद पठाण सर्व रा. फत्तेपूर ता. जामनेर यांनी चापटा बुक्क्‌यांनी मारहाण केली. यातील संशयित आरोपी एजाज पठाण याने मोठा दगड घेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे. 

Protected Content