चंद्रकांत पाटलांनी केली वन अधिकाऱ्यांची कान उघडणी (व्हिडीओ)

मुक्ताईनगर – पंकज कपले  |   तालुक्यातील धनगर समाजाच्या वनचराईत करणाऱ्या मेंढपाळांवर वनविभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाई संदर्भात आज आ. चंद्रकांत पाटील यांनी   वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन त्यांची कान उघडणी केली.

 

आ. चंद्रकांत पाटील यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीला डी. एफ. ओ. उमेश बिराजदार, वन क्षेत्राधिकारी सचिन ठाकरे, अनंतराव देशमुख, नायब तहसीलदार वाडे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटूभाई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, विभागप्रमुख नवनीत पाटील, धनगर समाजाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक राजेंद्र हिवराळे, असंख्य मेंढपाळ उपस्थित होते.

धनगर समाजाचे मेंढपाळ चराई करण्याकरिता वनक्षेत्र हद्दीत सातत्याने जात असतात त्याचप्रमाणे त्यांना सन २०१७ – १८  मध्ये मेंढपाळांची वनचराई करणे करता शासनातर्फे पासेसही देण्यात आल्या होत्या.  परंतु, आता त्या बंद असून त्यांच्यावर वनचराई करताना आढळल्यावर अव्वाच्या सव्वा दंड आकारला जातो.  शासन दरबारी पासेस पुन्हा मिळाव्या अशा स्वरूपाच्या मागण्या   मेंढपाळांनी  आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या. यानंतर आ. पाटील यांनी वन अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत मेंढपाळांवर चराई  संदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या रकमेबाबत वन अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. तसेच वन अधिकरी व कर्मचारी संगनमताने होत असलेल्या जंगलतोडी संदर्भात वन अधिकारी यांना धारेवर धरीत त्यांच्यावर कारवाई  अशी विचारणा केली. तसेच  चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचे कार्य वनविभागा मार्फत होत असल्याचेही आ.  पाटील यांनी खडसावले.   मेंढपाळ चराई करणारा हा गरीब दुबळा असून धन  दांडगे जंगल तोड करून सर्रास लाकडांची वाहतूक करतात यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी आ.  पाटील यांनी दिले.  लवकरच वनमंत्री यांच्याशी बैठक घेऊन सविस्तर विषय मांडणार असल्याचे देखील यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Protected Content