वसुलीचे पैसे घेणारे नंबर वन म्हणजे अनिल देशमुखच

 

मुंबई : वृत्तसंस्था । वसुलीचे पैसे घेणारे नंबर वन म्हणजे अनिल देशमुख हेच असल्याचं सचिन वाझेने आपल्या जबाबात सांगितल्यांची माहिती ईडी सूत्रांनी दिली आहे.

 

मुंबई पोलीस दलातील अटकेत असलेला निलंबित एपीआय सचिन वाझेने ईडीकडे अनेक खुलासे केले आहेत. 100 कोटी वसुली प्रकरण आणि अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. तळोजा जेलमध्ये  असलेल्या वाझेने ईडीला दिलेल्या माहितीमुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.

 

आरोपी सचिन वाझेने तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती. त्यानुसार ईडीला 10 ते 12 जुलै या काळात चौकशीसाठी परवानगी मिळाली.

 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेची तळोजा जेलमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी वाझेला अनेक मुद्यावर प्रश्न विचारण्यात आलेत. वाझेला माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या तक्रार अर्जाबाबत, परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचा केलेल्या आरोपाबाबत, काही बार मालकांनी सचिन वाझेला दिलेल्या पैशांबाबत प्रश्न विचारण्यात आले.

 

सचिन वाझेने आपण हे पैसे अनिल देशमुख यांचे पी ए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना दिल्याचं याआधी सांगितलं होतं. याबाबतही त्याला विचारण्यात आलं. या सगळ्या मुद्यांवर सचिन वाझेने सविस्तर उत्तरं दिली आहेत.

 

सचिन वाझेने ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. हा सर्व पुरावा ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्याविरोधात वापरण्याच्या तयारीत आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता.

 

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार मालकाकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला होता. या आरोपानुसार ईडीने तपास केला. अनेक बार मालकांचे जबाब नोंदवले. यावेळी बार मालकांकडून डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात चार कोटी 70 लाख रुपये गोळा करण्यात आले.

 

हे पैसे सचिन वाझे यांना देण्यात आल्याचं बार मालकांनी जबाब दिला आहे. बार मालकांकडून पैसे घेताना हे पैसे नंबर एक यांना द्यायचे आहेत, असं सचिन वाझे सांगायचा. नंबर वन म्हणजे नक्की कोण याचा खुलासा ईडीच्या अधिकाऱ्यांना होत नव्हता. त्याचाही खुलासा सचिन वाझे याच्या जबाबात झाला आहे.

 

100 कोटी पैकी चार कोटी 70 लाख रुपयांच्या रोख रखमेचा ईडीच्या तपासात खुलासा झाला आहे. बाकी रक्कम कुठून गोळा झाली, कोणी गोळा केली, ती रक्कम कोणाला देण्यात आली, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत.

 

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक हे देखील दोषी असल्याचे आढळले आहे. जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. दोघं स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. पण ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे

 

Protected Content