पुद्दुचेरी : वृत्तसंस्था । “तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?,” असं एका मुलीने राहुल गांधी यांना विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना, “या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन,” असं म्हटलं. राहुल यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेलं नाही. राहुल गांधी यांना अनेकदा विरोधकांकडून सोशल मीडियावर लग्न या विषयावरुन ट्रोल केलं जातं. राहुल गांधी यांची प्रेयसी आहे का यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसून खुद्द राहुल गांधींनीही कधी यासंदर्भात उघडपणे खुलासा किंवा वक्तव्य केलेलं नाही. मात्र पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना प्रेयसीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला प्रेयसी आहे की नाही असं राहुल यांना भर कार्यक्रमामध्ये एका मुलीने विचारलं
पुद्दुचेरीमधील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. याचदरम्यान एका मुलीने राहुल यांना, ‘सर’ असं म्हटलं असता त्यांनी, ‘माझं नाव सर नसून राहुल आहे,’ असं म्हटलं आणि त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. “तुम्ही तुमच्या मुख्यध्यापकांना सर म्हणा. मला हवं तर तुम्ही राहुल अण्णा (मोठा भाऊ) असं म्हणू शकता,” असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. राहुल यांना सर म्हणणाऱ्या मुलीने आपला प्रश्न पूर्ण पुढे हा प्रश्न विचारला होता
राजकारण वगळता तुमचे इतरही मित्र आहेत का?, तुम्हाला मैत्रिणी आहेत का?, असतील तर त्या कोणत्या क्षेत्रात काम करतात असा प्रश्नही एका मुलाने राहुल यांना विचारला. “माझे अनेक मित्र आहेत. काही राजकारणातील आहेत तर काही बाहेरचे आहेत. काहीजण असे आहेत जे मला त्यांचा राजकीय शत्रू मानतात. मात्र मी त्यांना माझा मित्रच मानतो, ” असं उत्तर राहुल यांनी दिलं.
एलटीटीईने तुमच्या वडीलांना मारलं यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, “माझ्या वडीलांची हत्या झाली तेव्हा मला फार दु:ख झालं होतं. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये काहीच द्वेष नाहीय. मी त्यांना माफ केलं आहे.”