कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार के.पी. पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. ते मविआमधून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्याचसाठी ही भेट घेतल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान भाजपचे नेते समरजीत घाटगे हे आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्या दौऱ्यासाठी शरद पवार हे शहरात मुक्कामी असून पुढील 4 दिवस ते शहरात असल्याने राजकीय भेटींना वेग आला आहे.
के. पी. पाटील हे कोल्हापुरातील राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. मात्र विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळेल. यामुळे महायुतीमध्ये उमेदवारी मिळत नसल्याने के.पी.पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय शिल्लक नाही. या मतदारसंघातील दुसरे इच्छुक उमेदवार ए. वाय. पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता दोघांपैकी नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर हे दोन्ही नेते परस्परांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. हे दोघेही जवळपास एकाचवेळी शरद पवार यांना भेटण्यासाठी हॉटेलवर दाखल झाले होते.