Home Cities जळगाव  अकोल्याच्या नीता वायकोळे यांना पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार

 अकोल्याच्या नीता वायकोळे यांना पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार


अकोला-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीता यशवंत वायकोळे यांना उल्लेखनीय समाजसेवेबद्दल प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, वंचितांसाठी सातत्यपूर्ण कार्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून अकोला जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.  Neeta Vaikole from Akola to be conferred with Padma Shri Dr. Manibhai Desai National Service Award

पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात २७ एप्रिल रोजी झालेल्या भव्य समारंभात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे, खादी व ग्रामोद्योग मंत्री रविंद्र साठे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठान, नीती आयोग भारत सरकार संलग्न राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

सौ. नीता वायकोळे या महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या महिला उपाध्यक्ष (विदर्भ विभाग) म्हणून कार्यरत असून दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला यांच्या माध्यमातूनही त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गरजू, अनाथ मुला-मुलींना मदत, दिव्यांग बांधवांना सहकार्य आणि महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या सातत्याने काम करत आहेत.

त्यांचे कार्य केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून रॉबिन हूड आर्मी या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्या ज्ञानदान, अन्नदान आणि वस्त्रदान उपक्रमातही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. समाजसेवा हा केवळ उपक्रम नसून जीवनमूल्य आहे, या भावनेतून त्यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे.

विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव हे त्यांचे मूळ गाव असून खान्देशाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. जळगावसह महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांशी त्या संलग्न असून सकल लेवा महिला मंडळ भुसावळच्या अधिकृत सदस्य म्हणूनही त्या काम पाहत आहेत.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना नीता वायकोळे यांनी हा सन्मान केवळ स्वतःचा नसून सामाजिक कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे सांगितले. कुटुंबीयांचे पाठबळ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे कार्य शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पती यशवंत वायकोळे, मुलगा कुशल, सून उर्मी, मुलगी राजश्री, जावई गिरीश बऱ्हाटे, भाची अमृता पाटील, पुतणजावई डॉ. दिपक लोखंडे तसेच रॉबिन हूड आर्मी अकोला टीम आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विशाल कोरडे यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

भविष्यातही निस्वार्थ भावनेने समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या सन्मानामुळे अकोला आणि खान्देश परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी हा प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

 


Protected Content

Play sound