वैद्यकीय अधिकाऱ्यांची मिसिंगची तक्रार दाखल करा : आ.खडसे

ekanath khadase

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे गोदावरी मंगल कार्यालयात दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी तालुका समन्वय समितीची बैठक माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयातील गायब असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्याचा आदेश आ.खडसे यांनी पो.नि. सुरेश शिंदे यांना दिला असून विविध विषयांवर आढावा घेण्यात आला. ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वच्छता ॲपचे याप्रसंगी लॉन्चिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, आरोग्य समितीवर असलेले माजी सभापती राजेंद्र माळी यांना तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी हरवल्याची तक्रार दाखल करण्याचे समितीत ठरविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. येथील वैद्यकीय अधिकारीचे एक पद रिक्त असून डॉ.जितेंद्र नारखेडे, दुसरे वैद्यकीय अधिकारी हे 10 ऑगस्ट 2017 पासून जिल्हा रुग्णालयात आलेलेच नसून ते गैरहजर आहेत. तसेच डॉ.गणेश भारुडे हे 12 फेब्रुवारी 2016 पासून हजर झालेले नाहीत, त्यांनी राजीनामा दिला असला तरी तो मंजूर झाला नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी 2 डॉ. प्रदीप रघुनाथ काकडे हे 1 मे 2016 पासून उच्चशिक्षणासाठी नोकरी सोडून गेलेले आहेत. मात्र या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती याच जिल्हा रुग्णालयात असल्याने ते सतत गैरहजर दिसत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्याचे समितीने आदेश दिले.

इतके पद रिक्त
कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही पदे रिक्त असल्याने ती देखील भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शिक्षण विभागातील 127 पदे एकूण रिक्त असून त्यापैकी 84 शिक्षक हे मुक्ताईनगर तालुक्यात कमी असल्याने समितीने या प्रसंगी तीव्र नाराजी व्यक्त केले. बदली झालेल्या शिक्षकांना दुसरीकडून आलेले शिक्षक हजर झाल्याशिवाय त्यांना सोडले कसे ? याबद्दलही त्यांना धारेवर धरण्यात आले आहे.

पास केंद्र उघडणे
एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्या कमी का करण्यात आल्या? याचा जाब विचारण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पासेस् वेळेवर मिळाले पाहिजे, यासाठी गटनिहाय किंवा ग्रामीण स्तरावर तालुक्यात पास केंद्र उघडण्यात यावे, अशी सूचना ही करण्यात आली. याप्रसंगी आगारप्रमुख साठे यांनी कर्मचारी संख्या कमी असल्याने या समस्या उद्भवत असल्याचे सांगितले.
तालुक्यात सहकार विभागांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा ऊहापोह करण्यात आला. पाच पैकी तीन पदे रिक्त असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

शेतक-यांना कर्जमाफी मिळाली
तसेच 8 हजार 926 शेतकऱ्यांना 32 कोटी 25 लक्ष रुपयांची कर्जमाफी मिळाली असून 6 हजार 800 शेतकऱ्यांना अजून रक्कम मिळालेली नाही. मात्र त्यांची ऑनलाईन माहिती पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. सहकारी संस्थांमध्ये 14 संस्था थकबाकीदार असल्याचेही या प्रसंगी सांगण्यात आल्या.  कृषी विभागअंतर्गत येणाऱ्या कोपरा योजनेतील गावांमध्ये कामाचा आढावा कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिला. मुक्ताईनगर तालुक्यात तेलबिया पिकांची पेरणी वाढली पाहिजे असे सांगण्यात आले. तसेच कृषी सहाय्यकांना ग्रामपंचायतमध्ये बसण्यासाठी जागा करून देण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी केले.

रस्त्यांची मंजुरी
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या करती बेलवाडी या रस्त्याचे खड्डे मोजण्यासाठी मंजुरी मिळाली असून मुरूम व खडी मिळण्यासाठी तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी पाटील यांनी व्यक्त केली. विद्युत विभागातील सौभाग्य योजनेअंतर्गत धुळे व चिंचखेडा गावांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे दोन्ही बाजूला उंच गटारी बांधण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार याप्रसंगी माजी सभापती विलास धायडे यांनी केली. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे ही समितीने सांगितले. तसेच बहुतांशी ठिकाणची धरणे भरले व बंधारे वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे नुकसान होत आहे. तसेच रस्ते बुडाल्याने शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी त्रास होत असल्याने पाईप टाकून रस्ते वापरण्यायोग्य करा असे आदेशही देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, जिल्हा परिषदचे ग्रामीण व स्वच्‍छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर.लोखंडे, तहसीलदार शाम वाडकर, प्रभारी सभापती प्रल्हाद जंगले, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, जिल्हा परिषदचे सदस्य निलेश पाटील, समितीचे सदस्या आशा पाटील, रंजना कांडेलकर, राजेंद्र माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, योगेश कोलते, विलास धायडे हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Protected Content