जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगार राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय-३०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल बऱ्हाटे पराठे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाणे, जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यात खुनाचा प्रयत्न, मोठी दुखापत करणे, दंगल घडविणे, सरकारी नोकरांवर हल्ला करत जिवे ठार मारण्याची धमकी देणे यांचा समावेश आहे. या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा गंभीर गुन्हे करत होता. अनुषंगाने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी चौकशी पूर्ण करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधिक्षक एस. राजकुमार यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठविला होता. याबाबत संपूर्ण चौकशी करून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी गुन्हेगार राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय-३०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याला एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. विनोद बोरसे, योगेश बारी, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, विशाल कोळी, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर, रामकृष्ण पाटील, मुकेश पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनुस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत पाटील यांनी गुन्हेगार राहुल बऱ्हाटे याला घेवून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.