जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका – जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशन

जळगाव, प्रतिनिधी । चिंचोली शिवारातील उमाळा – नशिराबाद रोडजवळील ग्रामीण उद्योजकांना सध्या वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. याबाबत शनिवारी २२ मे रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे. तसेच चिंचोली फिडरचे काम रखडले असून ते लवकर पूर्ण व्हावे असे साकडे घातले आहे.

निवेदनात म्हट्ले आहे की, चिंचोली शिवारात विद्युत फिडरच्या कामाला मंजुरी मिळाली असली तरी अद्याप त्याचे काम सुरु झाले नसून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन आणि भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून देखील या समस्येवर तोडगा निघालेला नाही. यामुळे कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. तरी पालकमंत्री यांनी ही समस्या सोडवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

यावेळी अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, राजीव बियाणी, अनिल माळी, किशोर ढाके, मनोज मित्तल, हरीश जोशी, अरुण बोरोले आदी उपस्थित होते .

चिंचोली फिडर बसून मिळावे यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री

वीज पुरवठा सारखा जातो याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो व आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. ग्रामीण उद्योजकांच्या विकासासाठी चिंचोली फिडर बसून मिळावे, यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. यासाठी राज्य शासनाची तांत्रिक परवानगी लागते. त्याबाबतचा पाठपुरावा मी करीत आहे, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण उद्योजकांना दिले आहेत. उद्योजकांच्या समस्या व अडचणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतल्या तसेच लॉकडाऊनमुळे सध्या परिस्थिती काय आहे याचे आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

Protected Content