जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल १३२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 2281 इतकी झाली आहे. यात सर्वाधिक २७ रुग्ण चोपडा. तर जळगाव शहर, पारोळा आणि भडगाव तालुक्यात रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे.
आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात जळगाव शहर-१८; जळगाव ग्रामीण-६; भुसावळ-१०; अमळनेर-२, चोपडा-२७, पाचोरा-५, भडगाव-१८, धरणगाव-३, यावल-५, एरंडोल-४, जामनेर-२, रावेर-८, पारोळा-१३, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२, अन्य जिल्ह्यातील-२ अशा रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आजच्या रिपोर्टमध्ये चोपडा तालुक्यात तब्बल २७ रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता येथील आजवरच्या कोरोना बाधीत रूग्णांची संख्या तब्बल १९३ इतकी झालेली आहे. मध्यंतरी चोपडा तालुक्यातील संसर्गाच्या प्रमाणात थोडी घट झाली होती. तथापि, आता मात्र येथील रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच प्रमाणे आज जळगाव शहरात १८ रूग्ण आढळून आले आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे अधोरेखीत झालेले असून यात आज पुन्हा नवीन रूग्ण दाखल झाले आहेत. शहरातील रूग्णांची संख्या आता चारशेच्या पार पोहचली आहे. भडगावातील संसर्ग देखील नव्याने वाढू लागला असून यासोबत भुसावळातील वाढती रूग्ण संख्या देखील चिंतेचा विषय बनली आहे.
दरम्यान, एकीकडे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना यासोबत बरे होणार्यांची संख्या देखील वाढीस लागल्याची बाब ही दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे. काल सायंकाळपर्यंत १३३९ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून यात अजून काही रूग्णांची भर पडली आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्वतंत्र माहिती देण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रतिकार करण्यात प्रशासनाला बर्यापैकी यश लाभत असल्याचे दिसून येत आहे.