मुंबई वृत्तसंस्था । राज्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहचले आहे. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या जवळपास दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.३ टक्के एवढे झाले आहे.
राज्यातील उपचाराखाली असलेल्या करोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह ( १९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
राज्यात सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. काल आणि आज दैनंदिन रुग्णसंख्या निम्म्याने खाली आहे. काल पावणेआठ हजारापर्यंत रुग्णसंख्या खाली आली होती. आज ८५२२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. रिकव्हरी रेटही वाढत चालला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा १३ लाखाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.