माजी खासदार पित्यासह दोन मुलांचाही कोरोनाने मृत्यू !

 

भुवनेश्वर : वृत्तसंस्था । प्रसिद्ध मूर्तीकार आणि माजी खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच आज त्यांच्या दोन्ही मुलांचंही निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

 

रघुनाथ मोहपात्रा हे ७८ वर्षांचे होते. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कोरोनाचे उपचार घेत असताना ९ मे रोजी भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा लहान मुलगा प्रसंता मोहपात्रा हा ४७ वर्षांचा होता आणि तो ओडिशाच्या रणजी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होता. त्याचाही याच रुग्णालयामध्ये बुधवारी मृत्यू झाला. तर त्यांचा मोठा मुलगा जशोबंता मोहपात्रा जो ५२ वर्षांचा होता, त्याला बुधवारी प्रकृती गंभीर असल्याने एम्स रुग्णालयातून एसयूएम कोविड रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याचाही गुरुवारी मृत्यू झाला.

 

मोहपात्रा परिवारामध्ये सर्वात आधी प्रसंताला कोरोनाची लागण झाली. त्याच्यानंतर त्याचे वडील आणि भावालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या तिघांनाही भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसंता आणि त्याचे वडील रघुनाथ यांचा मृत्यू झाल्यानंतर जशोबंता याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

मोहपात्रा यांना सुशांत हा अजून एक मुलगा होता. मात्र, तीन वर्षांपूर्वी एका अपघातात सुशांतचा मृत्यू झाला. मोहपात्रा यांची पत्नी रजनी आणि त्यांच्या तिन्ही सुनांना शोक अनावर झाल्याची माहिती त्यांच्या परिवारातले भास्कर मोहपात्रा यांनी दिली.

 

राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी मोहपात्रा यांची शिफारस केली होती.

 

Protected Content