कोरोना : फायजरची लस ९५ टक्के प्रभावी

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेतील औषध कंपनी फायजरने कोरोना लशीबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनावर फायजरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

लस चाचणीबाबतचे अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. त्याशिवाय आता लवकरच लस मंजुरीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. लस वापरास मंजुरी मिळाल्यास अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

फायजर कंपनी ही लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित करत आहे. ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. चाचणीचा अंतिम डेटा आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे म्हटले गेले होते.

फायजरकडे अंतिम डेटा आला असून त्यानुसार ही लस ९५ टक्के प्रभावी आहे. सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेली जवळपास दोन कोटी लशीचे डोस उपलब्ध होतील. अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात लशीसंदर्भात १.९५ अब्ज डॉलरचा करार झाला असून ५० लाख नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार असल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट केले होते.

लशीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेले वृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यापर्यंत सर्व नागरिकांसाठी लस उपलबध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांत आणि दुसऱ्या डोसनंतर सात दिवसांमध्ये संबंधित व्यक्तिंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या पहिल्या भागात ही लस प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Protected Content