लोकसभा निवडणूक : अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

D65LkJXW0AAB1Qn

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला आज सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील ५९ मतदारसंघांत मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचे भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

 

उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातील मतदानाकडे सर्वाचे लक्ष आहे. तेथे पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांची प्रमुख लढत काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसपच्या उमेदवार शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याशिवाय, शत्रुघ्न सिन्हा यांचा पाटणा साहिब, सनी देओल यांचा गुरदासपूर हे मतदार संघ देखील महत्त्वाचे मानले जात आहेत. सातव्या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे. यामध्ये बिहारमध्ये 8, हिमाचल प्रदेशमध्ये 4, झारखंड 3, मध्य प्रदेशात 8, पंजाब 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 9 तर चंदीगड एका जागेवर मतदान पार पडणार आहे. सुमारे दहा कोटी मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकीटीवर मैदानात असून त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे आव्हान असणार आहे. पंजाबच्या गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओलला भाजपने उमेदवारी दिली आहे. सनी देओलच्या विरोधात काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुनील जाखड मैदानात आहेत. चंदीगडमधून भाजपच्या विद्यमान खासदार किरण खेर आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री पवन कुमार बन्सल यांच्यामध्ये सामना होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होत आहे. कोलकाता उत्तर आणि कोलकात दक्षिण दमदम, बारासात, बशीरहाट, जाधवपूर, डायमंड हार्बर, जयनगर आणि मथुरापूर या नऊ मतदार संघात एकूण 111 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेरच्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने १ लाख १२ हजार मतदान केंद्रे उभारली आहेत.

Add Comment

Protected Content