अखेर पहूर गावात कोरोनाचा शिरकाव; २७ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह

पहूर ,ता .जामनेर रविंद्र लाठे । आज दुपारी पहूर पेठ येथील रहिवासी सुप्रीम कंपनी मध्ये कामगार असलेल्या २७ वर्षीय युवकाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गावकर्‍यांनी आता तरी सावध व्हावे ,असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने केले आहे .

लोंढरी ( ता . जामनेर )येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आल्यानंतर पहूर येथील तीन जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांना जामनेर येथे संस्थात्मक विलीनीकरणासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान त्यातील एकाचा तपासणी अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आला असून दोन जणांनचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी दिली.
दरम्यान पहूर येथील पॉझीटीव्ह आलेल्या तरुणाच्या संपर्कातील तेरा लोकांची नोंद केली असली तरी मात्र प्रत्यक्षात बाधीत युवकासह चार जण कोवीड सेंटर जामनेर येथे दाखल झाले आहे. त्यामुळे अन्य लोक कोवीड सेंटर मध्ये केव्हा जाणार असा प्रश्‍न आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जितेंद्र जाधव व पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, यांनी पाहणी करून बाधित रूग्ण राहत असलेला परिसर सिल करण्यात आला आहे. पहूर पेठ ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे.

आतापर्यंत कोरोना मुक्त राहिलेले पहूर अखेर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सध्या पहुर बस स्थानकावर जणूकाही यात्रेचे स्वरूप आले आहे. अगदी सलून दुकानापासून पानटपरीपर्यंत आणि मांस विक्री पासून मद्य विक्री पर्यंत सर्व व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. सोशल डिस्टंसिंगचा तर पुरता बोर्‍या वाजला आहे. परिणामी रूग्ण वाढत असल्याने गावकर्‍यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उद्यापासून जामनेर आठ दिवसांसाठी बंद असून सोशल चेन रोखण्यासाठी पहूर मध्येही तात्काळ कठोर उपाय योजना कराव्यात ,अशी मागणी सजग गावकर्‍यांकडून होत आहे. सायंकाळी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी बसस्थानकावरील दुकाने बंद करण्यासाठी पोलिसी खाक्या दाखवीला .

कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी मेडिकल ,दुध डेअरी कृषी केंद्र या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने,व्यवसाय शुक्रवार ते शनिवार असे तीन दिवस बंद राहणार आहेत. समस्त पहूरकरांनी कोरोना नियंत्रणासाठी कडकडीत बंद पाळावा ,असे आवाहन पहूर पेठच्या सरपंच नीता रामेश्‍वर पाटील ,कसबेच्या सरपंच ज्योती शंकर घोंगडे , माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे ,माजी सरपंच प्रदिप लोढा, उपसरपंच श्यामराव सावळे,रेल्वे सेंट्रल बोर्डाचे सदस्य रामेश्‍वर पाटील, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे , शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी आदींनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाची सोशल चेन (सामाजीक साखळी ) तुटण्यासाठी तीन दिवसाऐवजी आठ दिवसांचा बंद पाळण्यात यावा ,त्यासाठी सरपंचांनी कोवीड नियंत्रण समितीची बैठक घ्यावी .व्यापारी असोसिएशन ,सर्व राजकीय पक्ष आणि प्रशासन या सर्वांना विश्‍वासात घेऊन एकमताने निर्णय घ्यावा,अशी मागणी सुज्ञ नाकरीकांकडून होत आहे.

Protected Content