कोरोनाशी लढण्यासाठी लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अमेरिकन औषध कंपनी एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जोरदार तडाखा बसलेला असताना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हा लढा अधिकाधिक कठीण होत चालला आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आलं आहे.

 

शरीरात प्रवेश केलेल्या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी अद्याप कोणतंही औषध बनवण्यात आलेलं नाही. मात्र, कोरोनाच्या विषाणूंचा सामना करणाऱ्या अँटिबॉडी शरीरात तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.

 

 

लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

 

लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे अधिकाधिक रुग्णांना कोरोनाचा सामना करण्यासाठी उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. कंपनीकडून केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

 

रॉश इंडिया या औषध कंपनीनेही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत.  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोना उपचारांसाठी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, “दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब आणि इमडेविमॅब यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये इतकी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० इतकी आहे.”

 

आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की,” “सिद्धांतानुसार मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूचे म्यूटेशन होण्याची शक्यता नाही. एखाद्या व्यक्तीस विषाणूऐवजी अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे मध्यम ते गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूची पुनरावृत्ती होण्यापासून टाळता येते. अँटीबॉडी कॉकटेलचा तर्कसंगत उपयोग “अत्यावश्यक” आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तीन-दहा दिवसांच्या आत अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेलचा वापर करावा,” असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. मोनोक्लोनल अ‍ॅण्टीबॉडी कॉकटेल उपचारामुळे कोरोनाच्या नविन व्हेरियंट्स पासून संरक्षण होऊ शकते असे कोणतेही पुरावे नाहीत, असेही ते म्हणाले

Protected Content