कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशभरात पोहचवायला हवा- शिवसेनेची अपेक्षा

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाबाबत काँग्रेसचे नेते राहूल गांधी अतिशय प्रगल्भतेने आवश्यक त्या सूचना केल्या असून हा ‘गांधी विचार’ देशभरात पोहचवायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. यात भाजपला जोरदार टोले देखील लगावण्यात आले आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातून राहूल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. यात म्हटले आहे की, कोरोना युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे. राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा राहुल गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सांगितले की, ”बाबांनो, ही भांडण्याची वेळ नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही.” श्री. गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे असा टोला यात मारण्यात आला आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘रँडम टेस्टिंग’ केल्यानंतरच आपण व्हायरसच्या पुढे जाऊ शकतो, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. श्री. गांधी हे देश-विदेशातील डॉक्टर्स, तज्ञ यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी संवाद साधल्यावरच राहुल यांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी हे जे सर्व मार्गदर्शन केले ते देशहिताचे आहे. सरकारकडून हे समोर येणे आवश्यक असते, पण रोज संध्याकाळी देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे रटाळ पत्रकार परिषदा घेऊन कोरोनाबाबत माहिती दिली जाते. राहुल गांधी यांची माहिती अधिक प्रगल्भ आहे. प्रसिद्धी माध्यमे व समाज माध्यमांनी तटस्थपणे कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, पण राहुल गांधी यांचे ऐकणे, त्यांचे विचार पोहोचवणे हा गुन्हा ठरू शकतो. पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यात कोरोनासंदर्भात तरी एखादी चर्चा थेट व्हावी असे हे गांधी विचार ऐकल्यावर प्रत्येकाला वाटत असावे. राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकट काळातील विरोधी पक्ष कसा असावा ते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content