कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले सक्षम अधिकारी

 

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा हा कोरोना हॉट स्पॉट म्हणून पुढे येत असतांना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत यासंदर्भातील आदेश त्यांनी आज निर्गमित केले.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व गोदावरी फाऊंडेशन संचलित उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटल येथे दाखल होणाऱ्या कोविड विषाणू बाधित रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर ॲम्बुलन्स उपलब्ध करून देणे, रुग्णालयात दाखल होण्यासाठी विलंब होऊ न देणे, आयसीयूमध्ये दाखल असणाऱ्या व क्रिटिकल असणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणे. याकरिता संबंधित हॉस्पिटलच्या ठिकाणी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणेकरून दाखल होणाऱ्या रुग्णांना आवश्यक सर्व सोयी उपलब्ध होतील. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात कृषी उप संचालक अनिल भोकरे, विधी अधिकरी हरूल देवरे, जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, सहायक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील, राज्य कर अधिकारी ज्ञानेश्वर वाघ, राज्य कर निरीक्षक राहुल पाटील, विक्री कर निरीक्षक डॉ. बाळकृष्ण खैरनार, राज्य कर अधिकारी विरभद्र बेंडके, राज्य कर अधिकारी नरेंद्र निकुंभ यांची बारा बारा तासांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वंना जिल्हा सामान्य रुग्णालयात आज मंगळवार ९ जून रोजी हजर होणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी काढले आहेत.

Protected Content