नवी दिल्ली : वृत्तसंस्था । एका संशोधनामध्ये अभ्यासकांना एक धक्कादायक गोष्ट दिसून आली आहे. कोरोनाचा संसर्गाचा परिणाम पुरुषांच्या लैंगिकतेवर होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या पुरुषांमधील शुक्राणूंचा दर्जा खालावतो असं संशोधकांनी म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन सव्वा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे तरी बाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जारी करण्यात आल्याने अनेकांना घरातच कोंडून रहावं लागलं. जगभरातील कोट्यावधी लोकांना संसर्ग झाला. तसेच कोरोनामधून सावरलेल्यांना या विषाणुच्या संसर्गाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. करोनासंदर्भात जगभरामध्ये अजून संशोधन सुरु आहे.
संशोधकांनी कोरोना विषाणू आणि त्याचा लैंगिकतेवर होणारा परिणाम यासंदर्भातील संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने संशोधन केलं. या संशोधनामध्ये कोरोना विषाणूचा शरीरामध्ये शिरकाव झाल्यानंतर शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशी जलद गतीने मरण पावतात असं अभ्यासकांना दिसून आलं. त्याचबरोबर पेशींना सूज येणे आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससारखा परिणामही दिसून येतो. एखाद्या पेशीला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचा वापर यामध्ये ताळमेळ न राहिल्यास पेशीच्या रचनेवर जो ताण पडतो त्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात. कोरोनाचे विषाणू ज्यापद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर परिणाम करता त्याच पद्धतीने ते पुरुष बीजाण्डांवर (टेस्टिकल्स) परिणाम करतात असंही संशोधनामध्ये आढळलं.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा व्यक्तीच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. जर्मनीमधील जस्टस-लीबिग-युनिव्हर्सिटीमधील बहेजाद हाजीजादेह मालेकी आणि बख्तियार टार्टिबियन हे दोन संशोधक प्रामुख्याने या विषयावर काम करत आहेत. या दोघांनाही दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दर दहा दिवसांनी कोरोनाची बाधा होऊन गेलेल्या ८४ पुरुषांची माहिती गोळा केली. या माहितीची तुलना त्यांनी १०५ सुदृढ पुरुषांच्या आरोग्यविषयक माहितीशी केली. या तुलनेमध्ये ज्या पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यांच्या शरीरामध्ये शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशींवर सूज येणे आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परिणाम अधिक असल्याचे दिसून आलं.
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास शुक्राणू निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये या गोष्टींमुळे रासायनिक बदल घडतात. याचा थेट परिणाम शुक्राणूच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या डीएनए रचनेवर आणि शरीरातील प्रथिनांवर होतो.
“ज्या पुरुषांचे शुक्राणू चांगल्या दर्जाचे नाहीत अशा पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होण्याची शक्यता असते. शुक्राणूंच्या दर्जासंदर्भातील अडचण असेल तर कालांतराने शुक्राणू निर्मिती करणाऱ्या पेशींसंदर्भातील रासायनिक प्रक्रिया पुन्हा सामान्य होते. मात्र कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या शुक्राणूंची निर्मिती सामान्यपणे होण्यासाठी अधिक काळ लागतो. जितक्या जास्त दिवस या आजाराचे परिणाम दिसता तितका गंभीर परिणाम होतो,” असं बहेजाद हाजीजादेह मालेकी यांनी सांगितलं. पुरुषांचे शुक्राणू हे करोनाचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या शारीरिक घटकांपैकी एक आहेत अशी अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेनं केली पाहिजे अशी मागणीही मालेकी यांनी केली आहे.
एकीकडे संशोधकांनी हा दावा केला असला तरी दुसरीकडे या संशोधनामध्ये सहभागी नसलेल्या तज्ज्ञांनी या विषयासंदर्भात अधिक अभ्यासाची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे.