भारतासाठी रशियातील लसीचे १० कोटी डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था / जगात सर्वात आधी मंजुरी मिळालेली रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून या लसीसाठी भारताची रशियन लस निर्मात्यांबरोबर चर्चा सुरु होती. गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे. रशियाने या लशीबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा भारताला दिली होती. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने माहिती दिली की डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे. लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे रशियाने सांगितले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रक्रिया लगेच सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.

रशियाच्या या लशीवर जगभरातून बरीच टीका झाली होती. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती. १०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते. लशीचा डोस दिल्यानंतर ठराविक दिवसांनी अँटीबॉडीज शरीरात तयार झाल्या असे अहवालात म्हटले होते. चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यास पुढच्यावर्षीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. भारतात सध्या कोव्हॅक्सीन, ऑक्सफर्ड आणि झायडसने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत.

Protected Content