कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

नाशिक । कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

नाशिक येथे आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे नुतनीकरण व सौर ऊर्जा रुफ टॉप प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, विद्यापीठाच्या ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या कार्यक्रमास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री तथा प्रति कुलपती अमित देशमुख, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, कुलगुरू प्रा.डॉ.दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू प्रा.डॉ.मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, नेतृत्वाशिवाय फॉलोअर्स काहीच करू शकत नाही. खऱ्या नेत्याची ओळख कठीण प्रसंगी, युद्ध प्रसंगी होते. करोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी धैर्य दाखवीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तसेच सर्व परीक्षा यशस्वीरित्या घेऊन दाखविल्या यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. भविष्य काळात विद्यापीठात अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, फिजिओथेरपी या सारख्या अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु होणार असून येणाऱ्या काळात इमारतीच्या नूतनीकरणासोबत बुद्धिमत्तेचेही नूतनीकरण आपणास पहावयास मिळणार आहे; असे सांगून राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास सतत धरावयास हवा असेही सांगितले.

Protected Content