एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ ; नारायण राणेंचा दावा

 

वसई: वृत्तसंस्था ।  शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा दावा नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी  केला आहे.

 

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी राणेंनी हा मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही त्यांनी केला.

 

यावेळी त्यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं आहे. माझ्यावर टीका केली की मंत्रिपद मिळतं, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई असो वा वसई-विरार. आमच्या हाती सत्ता द्या. आम्ही विकास करून दाखवू, असंही ते म्हणाले.

 

राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद अधिक वाढला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा मी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडत नाही, असं ते म्हणाले. मनसे आणि भाजपा मैत्री झाली पाहिजे. ही युती झाली तर त्याचा आनंदच असेल, असंही ते म्हणाले.

 

निर्यात केली तर दरडोई उत्पन्नही वाढेल. आर्थिक समृद्धीकडे देश वाटचाल करेल. अमेरिका आणि चीन प्रमाणे महासत्ता बनू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम आणि कार्य पाहून अभिमान वाटतो. त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री आहे. हे माझं भाग्य आहे. देशातील 80 टक्के उद्योग माझ्या खात्याकडे आहेत. तरुण-तरुणींना उद्योजक बनवण्याचं काम माझ्याकडे आहे. बेकारी कमी करावी, गरीबी कमी करावी यासाठी तरुणांनी लघू आणि सुक्ष्म उद्योग सुरू करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

 

राज्यात 3 लाख कामगार आज बेकार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहीत नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा व्यवसाय करा. नोकऱ्या द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करा, असा टोला त्यांनी शिवसैनिकांना लगावला आहे.

 

वसई-विरारमध्ये इमारती झाल्या. पण बेकारी कायम आहे. आजूबाजूला इमारती झाल्या. पण विकास झाला नाही. मुंबईला जायला रस्ते नाहीत. लसीसाठी स्वत: राज्यसरकारचा बजेट आहे. त्यांनी आपल्या लोकांसाठी लस खरेदी करावी, पण टक्केवारी घेऊ नये, असा टोला लगावतानाच राज्याचा मुख्यमंत्री बदलाला तरी राज्याचा विकास होतो, असं ते म्हणाले.

 

आम्ही गर्दी वाढवत नाही. लोक गर्दी करत आहेत. काही लोकांना बघून लोक तोंड फिरवतात. आम्ही गाडी भरून माणसं आणत नाहीत. आमच्यासाठी लोक थांबतात. माझ्या आयुष्यात जे पद मिळाले ते लोकांमुळे मिळाले. मला पिंजऱ्यात बसून काही मिळाले नाही. जे काही मिळालं ते जीव धोक्यात घालूनच मिळालं आहे. त्यामुळे पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

 

Protected Content