१२ दहशतवादी दिल्लीत घुसले : मोदी, शहा अन डोवालही टार्गेट

modishahadoval

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा मिळाल्यापासून पाकिस्तानी दहशतवादी देशात मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व सुरक्षा सल्लागार डोवाल हे तिघे त्यांच्या खास निशाण्यावर आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये सुमारे १२ दहशतवादी घुसले आहेत.

 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असलेल्या दहशतवाद्यांनी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन ते चार प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या गटांना दिल्ली, काश्मीर आणि पंजाब येथे ‘करू किंवा मरू’ या सूत्रांनुसार हल्ले करण्यासाठी पाठवले आहे, असे गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांचे म्हणणे आहे. हे दहशतवादी ‘दिवाळी फटाके’, ‘काश्मिरी सफरचंदांचा दिल्लीत पुरवठा’ यासारख्या संवादासाठीचे सांकेतिक शब्दांचा आधार घेत भारतात प्रवेश केला आहे.

सफरचंदाच्या बागेत योजना
दिल्लीत मोठा घातपात घडविण्याची गुप्त योजना पाच दिवसांपूर्वी काश्मिरमधील एका सफरचंदाच्या बागेत तयार करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. जैशचा जम्मू-काश्मीरचा कमांडर अबू उस्मान याने हा कट आखला या गुप्त योजनेला ‘डी’असे नाव दिले आहे. गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आलेल्या अॅलर्टमध्ये याबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरातील बांदीपोरा जिल्ह्यातील सफरचंद बागेत पाच दिवसांपूर्वी जैश प्रशिक्षित दहशतवाद्यांची गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत ‘आमचे भाऊ या ठिकाणांवर (घातपात घडवण्यासाठी) यापूर्वीच पोहोचले आहेत असा दावा अबू उस्मान याने केल्याचे समजते. या बैठकीत एक पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवादी उपस्थित होते. अबू उस्मानकडे स्निपर रायफल होती, तर उर्वरित तीन दहशतवाद्यांकडे एके-४७, पिस्तूल आणि हँड ग्रेनेड होते.

पाच दिवसांपूर्वीच मिळाली माहिती
गुप्तचर यंत्रणांना या दहशतवादी कटाबाबत पाच दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. जैश कमांडर अबू उस्मान याने बांदीपोरा भागातील मीर मोहल्ला येथील एका सफरचंदाच्या बागेत ओव्हर ग्राऊंड कामगारांची बैठक घेतली. या बैठकीत त्याने काश्मीरमधील लोकांना लवकरच एक चांगली बातमी ऐकायला मिळेल असे म्हटले आहे. ही बातमी जम्मू आणि दिल्लीमध्ये मोठे स्फोट घडवणारी असेल असे जाहीर केले. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांना पुरवली आहे.

मोदी, शहा अन डोवाल टार्गेट
गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांमध्ये काश्मिरी, अफगाणी आणि दोन पाकिस्तानी तरुणांचा समावेश आहे. या दहशतवादी टीममध्ये काही आत्मघातकी दहशतवादीही आहेत. या दहशतवाद्यांनी सुरक्षित मार्गांनी दिल्लीत घुसखोरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या दहशतवाद्यांनी पुलवामा बॉम्बस्फोट, कंधारसारखे विमान अपहरण आणि मुंबईसारख्या हल्ल्यांसारखे घातपात घडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गर्दीच्या ठिकाणांबरोबरच महत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. त्यात दिल्ली, हिंडन एअरबेस, जम्मू, पठाणकोट, श्रीनगर आणि लेहमधील ठिकाणांवर हल्ले करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असणार आहे.

Protected Content