नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमेवर महिन्याभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
केजरीवाल सरकार शेतकऱ्यांसाठी सिंघू सीमेवर फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार आहे. आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. “खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला”, अशी माहिती राघव चड्ढा यांनी दिली.
“फ्री वाय-फाय सेवा आंदोनकर्त्या शेतकऱ्यांना केवळ कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंगच नव्हे तर भाजपाच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठीही फायदेशीर ठरेल” असं चड्ढा म्हणाले. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
मागील महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार आज चर्चा करणार आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दुपारी दोन ते तीनच्या सुमारास विज्ञान भवनात बैठक होत आहे. केंद्र सरकारनं चर्चेसाठी निमंत्रित केल्यानंतर शेतकरी संघटनांनीही बैठकीतील चर्चेच्या मुद्द्यांबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करावी, किमान आधारभूत किमतीची हमी द्यावी, वीजदुरुस्ती विधेयकात बदल करावेत आणि खुंट जाळल्याबद्दल होणाऱ्या कारवाईतून शेतकऱ्यांना वगळावे, असे चार मुद्दे शेतकऱ्यांनी केंद्रापुढे ठेवले आहेत.
या चार मुद्द्यांवर तर्कशुद्ध तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी, असे पत्र ४० संघटनांच्या वतीने मंगळवारी केंद्राला पाठवलं आहे. ‘‘या बैठकीत तोडगा निघू शकतो. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, अन्य मंत्र्यांच्या तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेच्या फलनिष्पत्तीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ५ डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या पलीकडे जाऊन केंद्राने एक पाऊल पुढे टाकले तरी तोडगा निघेल, अन्यथा शेतकरी संघटनांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल’’, असे मत ‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचा बुधवारचा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाचा मंगळवारी ३४ वा दिवस होता. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलकांचे साखळी उपोषणही कायम आहे. केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या चर्चेत तोडगा निघणार का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज होणाऱ्या बैठकीनंतर मिळणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष बैठकीकडे लागलं आहे.