किशोर पाटील कुंझरकर दाम्पत्याचा घर..घर..शाळा..शिक्षण आपल्या दारी उपक्रम….

 

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे राज्यात सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू झाले असले तरी आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत आहे. या अडचणींचे रडगऱ्हाणे न गाता प्रयोगशील प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी घर…घर..शाळा – शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविले आहे.

आदिवासी वस्ती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिल्ल वस्ती, गालापूर, ता. एरंडोल, जि. जळगाव या शाळेचे उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर व जि. प. उच्च प्राथमिक शाळा, गालापुरच्या शिक्षिका तथा किशोर पाटील यांच्या पत्नी जयश्री पुरुषोत्तम पाटील यांच्या स्वकल्पनेतून आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे घरी जात त्यांचे अंगणातच खाटेवर तर कधी दारी खाली बसून शालेय शिक्षण विभागाने दिलेली पाठ्य पुस्तक तसेच मार्गदर्शिका आणि विविध उपक्रम माध्यमातून कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क सॅनिटायझरचा वापर करून पालकांच्या मदतीने सहकार्याने घर… घर.. शाळा शिक्षण आपल्या दारी हा अभिनव प्रयोग यशस्वी केला.

गरिबीमुळे मोबाईल स्मार्टफोन नसलेल्या आदिवासी वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाला प्रवाहित ठेवण्याचे काम कोरोना काळात केल्याने जळगाव जिल्ह्यातून आदिवासी वस्तीवरून एक धडपडी किशोर पाटील यांनी सुरू केलेल्या व गरिबांच्या शिक्षणासाठी कोरोनाच्या परिस्थितीत परिणामकारक ठरलेल्या घर..घर..शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रमांची या नावीन्यपूर्ण प्रयोगाची राज्य व देशपातळीवर स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम म्हणून दखल घेतली गेली आहे.

राज्याचे शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील, प्राथमिक विभागाचे संचालक द. गो. जगताप, सह संचालक दिनकर टेमकर, नाशिक विभागीय उप संचालक नितीन उपासनीक व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, जिल्हा परिषद मुख्याधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा शिक्षण अधिकारी (जि. प. प्राथमिक) बी. एस. अकलाडे, गट शिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील यांनी हा उपक्रम म्हणजे किशोर पाटील कुंझरकर व जयश्री पुरुषोत्तम पाटील या दाम्पत्यांनी परिस्थितीनुसार उचललेले सुयोग्य पाऊल असून खऱ्या अर्थाने कोरोना काळात सर्व नियम पाळून स्वतःच्या आरोग्याचा आणि शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा समन्वय साधत उचललेले प्रेरणादायी पाऊल असल्याचे म्हणुन त्यांच्या उपक्रमाचे मनभरुन कौतुक केले आहे.

Protected Content