मुंबई : वृत्तसंस्था । शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. “शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सरकारची/म्हाडाची जागा बळकावीणे व अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरोधात मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली”, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आपण ठाकरे सरकारच्या तीन विकेट पाडणार, असेही सोमय्या यांनी अलिकडेच म्हटले होते. त्यामुळे आता अनिल परब सोमय्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.