काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार

मुंबई: वृत्तसंस्था । महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले असून, २५ रुपये किलो असलेला कांदा आता ७० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाजारात चांगला कांदा येण्याचे प्रमाणही कमी होत आहे. त्याचाच परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या दररोज ५० ते ५५ गाड्या येत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कांद्याचे दर खाली आले होते. चांगला कांदा १० रुपये किलोच्या घरात होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वीपासून कांद्याच्या दरात वाढ होत गेली आणि १० रुपये किलो असणारा कांदा वाढत वाढत २० ते २५ रुपये किलोपर्यंत पोहचला. तर अलीकडच्या २० दिवसांत कांदा २० ते २५ रुपयांवरून ६० ते ६५ रुपये आणि आता तर ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याचे पीक भिजले आहे. त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर बाजारात येणारा कांदा पावसात भिजला आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याची पुढे टंचाई भासणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी मुंबई बाजारात कांद्याचे दर वाढले

घाऊक बाजारात ७० रुपये किलोने विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात ८० रुपये किलो झाला आहे. परिणामी गृहिणींचे स्वयंपाकघराचे गणित बिघडले आहे.

यंदा महाराष्ट्र आणि शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही कांद्याचे पीक चांगले आले होते. मात्र, लॉकडाउनमुळे हा कांदा व्यापाऱ्यांना विकता आला नाही. तो गोदामातच राहिला. त्यानंतर महाराष्ट्रात चक्रीवादळ आले आणि त्यापाठोपाठ झालेली अतिवृष्टी, मध्येच उकाडा, पाऊस असे विचित्र वातावरण निर्माण झाले. यामुळे कांद्याच्या तापमानात फरक पडला आणि हा साठवलेला कांदाही प्रमाणात खराब व्हायला लागला. आता पावसामुळे कांद्याचे पीकही पाण्याखाली गेल्याने ऑक्टोबरमध्ये येणारा कांदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून दर वाढायला सुरुवात झाली आहे.

Protected Content