खडसे समर्थकांना मिळाला निरोप; ‘या’ दिवशी होणार प्रवेश !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आता निरोप मिळाला असून प्रवेशाचा लवकरच ‘मुहूर्त’ असल्याने त्यांचे कार्यकर्ते याच्या कामाला लागले आहेत.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यात नाथाभाऊंनी बाळगलेले मौन हे अनेक प्रश्‍न आणि संभ्रवास्थांना आमंत्रीत करणारे ठरले आहे. त्यांनी याबाबत आजवर कोणतीही ठाम भूमिका जाहीर केलेली नाही. तर अलीकडेच त्यांनी प्रसारमाध्यमांनीच घटस्थापनेचा मुहूर्त ठरविल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुध्दा या प्रकरणी काहीही भाष्य केलेले नाही.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी मात्र आता आपल्या समर्थकांना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सांगितल्याची माहिती त्यांच्या एका समर्थकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे. यानुसार नाथाभाऊ हे गुरूवारी मोजक्या मान्यवरांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या सुध्दा राष्ट्रवादीत प्रवेश करतील. तर यानंतर मात्र जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा होऊन यात खडसे समर्थक मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येणार असून याची त्यांचे समर्थक तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content