कंवर नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीजवळील कंवर नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याचा प्रकार शनिवार १५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश खियलदास रावलानी (वय-५५) रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीरामपेठ येथे कपड्याचे दुकान आहे. नुकतेच रावलानी यांनी गणपती नगरातील साकार अपार्टमेंट येथे नवीन फ्लॅट घेतला असल्याने जुन्या घरातून नवीन घरात सामान टाकण्याचे काम सुरू होते. १० जानेवारी रोजी त्यांनी काही सामान शिफ्ट केले होते. त्यानंतर ११ वाजता कंवर नगरातील घराला कुलूप लावून ते गणपती नगरातील घरी गेले. त्यानंतर शनिवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सिंधी कॉलनीजवळील कंवरनगरातील जुन्या घरी गेले असता त्यांना घरात दरावाजाचे कुलूप तोडलेले दिसून अले. आत जावून पाहिले असता त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आला. लोखंडी कापटातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी हरीष रावलानी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पो.नि. प्रत्ताप शिकारे यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व योगेश बारी करत आहेत.

Protected Content