कंडोममुळं ‘तिनं’ जिंकलं मेडल !

 

टोकियो : वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाची कॅनोइस्ट जेस्सिका फॉक्सने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कायाकिंगमध्ये कांस्यपदक पटकावले. हे पदक तिला एका कंडोमचा वापर केल्यामुळे मिळाले आहे. तिला एका दुसऱ्या इवेंटमध्ये सुवर्णपदकही मिळाले आहे.

 

जेस्सिकाची जुनी कायाक (नौका) तुटली होती. तिने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मिळालेल्या कंडोमचा वापर तुटलेल्या कयाकसाठी केला. कंडोमचा वापर करत आणि एक शक्कल लढवत तिने ही कायाक ठीक केली.

 

 

 

 

नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जेस्सिकाने या गोष्टीचा खुलासा केला. ”तुटलेली कायक दुरुस्त करण्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेजमधून मिळालेला एक कंडोम वापरला होता. तिची युक्तीही कामी आली. या युक्तीच्या आधारे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यशस्वी झाली आहे”, असे २७ वर्षीय जेस्सिकाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितले.

 

जेस्सिका पुढे म्हणाली, ”मला वाटते, की मी माझ्या मनात ही शर्यत लाखो वेळा पाहिली असेल. कदाचित मी आज इतकी घाबरली नव्हती. माझी दृष्टी थोडी अस्पष्ट होती आणि मी कुठे होती आणि ते पुरेसे आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करीत होती. ऑलिम्पिकमध्ये काय होणार आहे हे आपणास कधीच ठाऊक नसते. आपल्याला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते.”

 

फ्रान्समध्ये जन्मलेली जेस्सिका फॉक्स तीन वेळा कॅनॉन स्लॅलम के वन वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिने २०१६ला रिओ डी जानेरोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१२ला लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९८८पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली. रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने ४,५०,००० कंडोमचे वाटप केले होते.

 

Protected Content