एसटी महामंडळाचे सांघीक कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या पाऊण शतकापासून अव्याहतपणे सेवा करणारी लालपरी अर्थात एसटीचा आज अमृत महोत्सवी  वर्धापन दिन आहे. याचे औचित्य साधून आज नवीन बस स्थानक परिसरात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गेल्या २५ वर्षात एकही अपघात न करणाऱ्या वाहकांचा २५ हजाराचा धादेश , शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक  सत्कार करण्यात आला. तसेच वाहकव  व्यक्ती विशेष अश्या कर्मचाऱ्यांचाही  सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तब्बल ८९ वर्षे वय असणारे एसटीचे सेवानिवृत्त ड्रायव्हर देखील उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी त्यांचा जागेवर जाऊन त्यांचा सत्कार केला.

 

एसटी महामंडळात अलीकडच्या काळात महिला चालकांची भरती देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या अनुषंगाने ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज  माधुरी भालेराव, मनीषा निकम, शितल अहिरराव, सुषमा बोदडे , सुनिता सपकाळे,  विद्या पाटील, सुनिता पाटील व संगीता भालेराव या आठ महिला चालकांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

 

राज्यातील ३१ विभागांमध्ये सर्वाधीक उत्पन्न मिळविणाऱ्या  तीन विभागांना गौरविण्यात आले असून यात जळगावचा पहिला क्रमांक लागला आहे. जळगाव विभागाने एका महिन्यात ४८ कोटी रूपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले असून पालकमंत्र्यांनी यामुळे विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गाव, वाड्या आणि वस्त्यांसह दुर्गम भागांना जोडण्याचे काम एसटीने केले आहे. आज वाहनाची अनेक साधने उपलब्ध असली तरी लालपरीची महत्ता कायम आहे. महिलांना प्रवासी भाड्यात दिलेली सवलत आणि उत्तम सेवेमुळे आता एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. जळगाव विभागाने तर अवघ्या एका महिन्यात तब्बल ४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवून विक्रम केल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद आहे. याच प्रकारे उत्तम प्रकारची सेवा बजावत हा पहिला क्रमांक कायम ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

एस.टी.च्या माध्यमातून ग्रामीण भाग हा खऱ्या अर्थाने जगाशी जुडला आहे. अनेक समस्यांवर मात करून एसटीची वाटचाल सुरू आहे. आम्हा राजकीय मंडळींचा बऱ्याचवेळा निवडणुकीत अपघात (पराभव)  होतो, मात्र एसटीचे कर्मचारी हे विना अपघाताने सेवा देत असल्याची बाब ही विशेष कौतुकाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तर जळगाव विभागाने आगामी काळात देखील अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर जळगाव ही राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक राजधानी असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले.  यावेळी संघटनांच्या वतीने विभागीय सेनेचे विभागीय सचिव आर के पाटील यांनी सांगितले की पालकमंत्र्यांच्या पाठपुरा पाठबळामुळे व मार्गदर्शनाखाली जळगाव विभाग हा उत्पन्न वाढण्यासाठी प्रथम क्रमांक आला असून एसटीचा कायापालट होत असल्याचे नमूद केले

 

यांची होती उपस्थिती

 

लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, दिलीप सांगडे, दिपक जाधव, डेपो मॅनेजर संदीप पाटील, विभागीय अभियंता निकष पाटील, वाहतुक अधिक्षक के. व्ही. महाजन, सांख्यिकी अधिकारी आर टी पवार,, नरेंद्र चित्ते, विजय पाटील, विविध संघटनेचे पदाधिकारी आर. के. पाटील,विनोद चितोडे, नरेंद्रसिंग राजपूत, संजय सूर्यवंशी, राहुल पाटील, मेकॅनिक कारागीर प्रदीप दारकुंडे एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून  करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी केलेल्या सांघिक प्रयत्नांची माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिक कारागीर प्रदीप दारकुंडे यांनी केले तर आभार राहुल पाटील यांनी मांनले.

Protected Content