स्टेट बँक दरोडा: पीएसआयनेच रचला बाप व शालकाच्या मदतीने डाव !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील का.ऊ.कोल्हे शाळेजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत दोन दिवसापूर्वी पडलेल्या दरोड्याची उकल जिल्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली असून धक्कादायक बाब म्हणजे एका पीएसआयनेच आपला मुलगा व शालकाच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले असून तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

कालींका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर गुरुवारी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याने जळगाव हादरले होते. गुरूवारी सकाळी ९ वाजता शाखा उघडण्यात आल्यानंतर कार्यालयीन चार ते पाच कर्मचारी उपस्थित होते. सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी डोक्यात हेल्मेट घालून बँकेत घुसले. बँकेत हजर असलेल्या कर्मचार्‍यांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल हस्तगत केला. त्यानंतर धमकावत सर्व कर्मचार्‍यांना कार्यालयातील शौचालयात कोंबून दिले. त्यानंतर बँक मॅनेजर राहूल मधुकर महाजन यांच्याकडे जावून लॉकरच्या चाव्या मागितल्या. याला प्रतिकार केल्यानंतर एका दरोडेखोराने हातात असलेल्या धारदार चाकून मॅनेजरच्या मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. बँकेतील कर्मचारी नयन गिते यांच्यावर देखील वार केल्याने हाताच्या बोटाला दुखापत केली.

दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे व १७ लाख रूपयांची रोकड असा एकुण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर चोरून नेला. दोन्ही दरोडेखोर येतांना पायी डोक्यात हेल्मेट घालून आले होते. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून पसार झाले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली होती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या जबरी चोरीची उकल करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, परिरक्षावधीन उप विभागीय पोलीस अधिकारी सतिष कुलकर्णी, परि उप विभागीय पोलीस अधिकारी, आप्पासाहेब पवार, एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके यांनी बँकेतील कर्मचारी व बँक मॅनेजर (फिर्यादी) यांना वेगवेगळी विचारपूस केली असता बँकेतील स्टाफ तसेच फिर्यादी व मनोज सुर्यवंशी याचे हकिगतमध्ये तफावत आढळल्याने मनोज सुर्यवंशी याचेवर संशय वाढल्याने त्यास अधिक विचारपुस केली.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा माझा पाहुणा शंकर जासक व त्यांचे वडील रमेश जासक असे आम्ही मिळून केला असून जबरी चोरीतील नेलेले सोन्याचे दागीने व पैसे पाहुणे शंकर जासक हे त्यांचे घरी कर्जत येथे घेवून गेले आहेत अशी माहिती दिली. पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधार्थ संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. गल्ली बोळातून फिरून वेगवेगळ्या पथकाने सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि धागेदोरे तपासले. त्यातून चोरट्यांचा मार्ग समजून आला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुसुंबा बसस्थानकजवळ मिळून आली तर बँकेचे डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचार्‍यांचे मोबाईल एमआयडीसी परिसरातील एक नाल्यात मिळून आले होते

माहितीवरून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी वेगवेगळे ३ पोलीस पथक तयार करून पथकात परिरक्षवधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांचे सोबत स्थानिक गुन्हे शाखा व शनिपेठ पो.स्टे. कडील पोलीस अमंलदार यांचे पथक तयार करून कर्जत येथे पाठवले.

पथकाने शंकर जासक याच्या मिळालेल्या पत्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, तो पोलीस उप निरीक्षक पदावर रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजुन आले आहे. त्याने त्याचा शालक मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस असल्याने त्याचे सोबत संगनमत करून शंकर रमेश जासक, त्याचे वडील रमेश राजाराम जासक (वय-६७) व शालक मनोज रमेश सुर्यवंशी अश्यांनी केला असून त्याने बँकेतून नेलेले सोने व रोकड देखील काढून दिली आहे.

पथकाने शंकर जासक याच्याकडून चोरीतील ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत केली आहे. उर्वरित ७० हजार रुपये हस्तगत करणे अद्याप बाकी आहे. शंकर जासक याच्यावर अगोदर निलंबनाची कारवाई झाली असून गेल्या वर्षभरापासून तो वैद्यकीय रजेवर आहे. पोलीस महासंचालकांनी रायगड पोलीस अधीक्षकांना शंकर जासाक याला बडतर्फ करण्याची कारवाई करण्याची सूचना केली आहे. शंकर जासक याचे वडील जळगावपासून जवळच असलेल्या मन्यारखेडा येथील रहिवासी आहेत. पोलीस प्रशासनाकडून तपास पथकाला बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे.

Protected Content