जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेला जळगाव जिल्ह्यात गती देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. योजनेच्या अंमलबजावणीत समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले की, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही केवळ कागदोपत्री योजना नसून ती शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांच्या सहभागातून कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ही योजना शेतात जाणाऱ्या बैलांच्या पावलांचा विचार करणारी असल्याने तिचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, असेही त्यांनी नमूद केले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी 50 टक्के काम ग्राम सडक योजना आणि 50 टक्के जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 25 किलोमीटरचा क्लस्टर तयार करून 14 डिसेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे जाळे मजबूत करण्याचा उद्देश आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी आठवड्यातून किमान एकदा बैठक घेऊन कामांची प्रगती तपासावी. स्थानिक आमदारांच्या सूचनांनुसार कामे सुरू करून त्यात गती आणावी, असे त्यांनी स्पष्ट केले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे यांनी योजनेबाबत सविस्तर सादरीकरण करून विविध टप्प्यांची माहिती दिली.
बैठकीत जिल्ह्याच्या प्रति तास दराला (एल 1) देखील समितीकडून मान्यता देण्यात आली, ज्यामुळे कामांच्या अंमलबजावणीत गती येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. एकूणच, मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे तिची प्रभावी अंमलबजावणी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.



