उत्परिवर्तनामुळे कोरोना आता आणखी धोकादायक

ह्युस्टन वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गाशी संपूर्ण जग दोन हात करत आहे. अशातच काळजी वाढवणारे संशोधन समोर आले आहे. या विषाणूचे उत्परिवर्तन (म्युटेशन) झाले असून विषाणू अधिकच धोकादायक झाला आहे. कोविड-१९ च्या या नवीन स्ट्रेनमुळे या विषाणूवर मास्कचा वापर आणि हात धुण्याचा काहीही परिणाम होत नसल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये मार्च महिन्यापासूनच शास्त्रज्ञ कोरोना विषाणूच्या संपूर्ण डीएनएवर संशोधन करत असून आतापर्यंत ५०८५ जीनोम सिक्वेंस (विषाणू क्रम) शोधून काढले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इन्फेक्शियस डिजीसचे विषाणूशास्त्रज्ञ डेविड मोरेन्स यांनी सांगितले की, कोरोना विषाणूने स्वरूप बदलले आहे. त्यामुळे आपल्याकडून करण्यात येणाऱ्या काही उपायांवरही ते मात करताना आढळत आहेत. हा विषाणू अधिक संसर्गजन्य असण्याचाही धोका आहे. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठीच्या पद्धतींमध्ये आणखी लक्ष द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा विषाणू अधिक संसर्गजन्य नेमका कधी होईल हे सांगणे कठीण आहे. बहुतांशी लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती, अॅण्टीबॉडी कधी विकसित होतील, हेही महत्त्वाचे आहे. विषाणूत होणाऱ्या बदलांकडे लक्ष दिले पाहिजे. या बदलानुसार लशीतही बदल करावे लागतील असेही मोरेन्स यांनी सांगितले.

या विषाणूतील डी 614 जी हे म्युटेशन अमेरिकेत सर्वाधिक आढळले आहे. म्युटेशनमुळे विषाणूच्या स्पाइक प्रोटीनची संरचना बदलली जाते. त्यामुळे हा स्ट्रेन अधिक फैलावतो. बहुतांशी लशी या विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला ओळखून त्याच्या विरोधात लढण्यासाठी अॅण्टीबॉडी निर्माण करतात. म्युटेशनचा यावर परिणाम झाल्यास ही बाब लस निर्मितीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. देशभरात कोरोनाचा जोर ओसरला असल्याचे चित्र असताना जवळपास ७३ देशांमध्ये बाधितांची संख्या वाढली आहे.

Protected Content