इंदूर येथे कोरोनामुळे डॉक्टराचा मृत्यू

इंदूर वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील इंदूर येथे करोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आता इंदूरमधील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. मध्यप्रदेश राज्यामध्ये सर्वाधित करोनाचे मृत्यू हे इंदूरमध्येच झाले आहेत. इंदूरमध्ये करोनाबाधितांची संख्या २१३ वर पोहोचली आहे.

डॉ. शत्रुघ्न पंजवानी असे करोनाने मत्यू पावलेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांच्यावर गोकुलदास येथे उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जडिया यांनी सांगितले आहे. डॉ. पंजवानी यांना गोकुलदासमधून अरविंदोमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक बनली होती. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. डॉ. पंजवानी हे इंदूरमधील रुपराम नगर येथे राहात होते.

करोना विषाणूच्या उद्रेकामुळे इंदूरला पूर्णपणे सील करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील करोनामुळे पहिल्यांदाच डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरच्या मृत्यूनंतर इंदूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी अधिक खबरदारी घेत आहेत. डॉ. पंजवानी यांना करोनाग्रस्तावर उपचार करत असतानाच करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बुधवारी देखील इंदूरमध्ये ४० करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. या बरोबरच इंदूरमध्ये करोना रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत इंदूरमध्ये करोनामुळे एकूण २२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content