नेपाळमध्ये गुंतवणुकीची चीनची तयारी

काठमांडू वृत्तसंस्था । भारतासोबत वाढत्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीन आता भारताच्या शेजारी देशांना आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. बेल्ट अॅण्ड रोड इनिशीएटीव्ह माध्यमातून चीन अनेक देशांमध्ये गुंतवणूक करत आहे. नेपाळमध्येही चीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. तिबेट आणि नेपाळला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पात चीनने आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनने तिबेटमधील पायाभूत सुविधेत जवळपास १४६ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे. ही रक्कम आधीच सुरू असलेल्या प्रकल्पांसह इतर नव्या प्रकल्पात गुंतवण्यात येणार आहे. यामध्ये बहुप्रतिक्षित नेपाळ तिबेट दरम्यानच्या रेल्वे लिंकला पूर्ण करण्याच्या कामाचाही समावेश आहे. चीन तिबेट-नेपाळ दरम्यान काठमांडू आणि तिबेटचे दुसरे मोठे शहर शिगात्सेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरही जोर देत आहे.

७२ किमीचा हा रेल्वे मार्ग तिबेटपासून काठमांडूहून लुंबिनीपर्यंत जाणार आहे. भारतीय सीमेजवळून हा रेल्वे मार्ग असणार आहे. नेपाळ हा भारत आणि चीन दरम्यान बफर झोन समजला जातो. नेपाळला भारत हा नैसर्गिक मित्र समजतो. नेपाळला आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीन सर्वपरीने प्रयत्न करत आहे.

Protected Content