शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असून त्यांच्याकडून निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. पवार यांनी स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत नोटीस आल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मला पहिली नोटीस इन्कम टॅक्स कार्यालयाकडून आली आहे. अजून सुप्रियाला आली नाही. चांगली गोष्ट आहे. देशातील इतक्या सदस्यांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला. या नोटिसीचं उत्तर द्यावं लागेल. नाहीतर दंड असतो. त्यामुळे त्या नोटिसीचं उत्तर देणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी विधेयक आणि मराठा आरक्षण, कांदा या व इतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन केले.

राज्यसभेच्या उपसभापतींची भूमिका ही सदनाच्या प्रतिष्ठेची व त्या पदाचे प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केले आहे. त्याला पाठिंबा देत आज एकदिवसाचे अन्नत्याग करत उपसभापतींच्या तथाकथित गांधीगिरीबाबत शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उपसभापतींनी नियमांना महत्त्व न देता सदस्यांचे मुलभूत अधिकार ठोकरले. हे करून पुन्हा जे सदस्य उपोषण करत आहेत त्यांना चहापान घेवून गेले मात्र त्या सदस्यांनी त्यांचा चहापान नाकारला. चहाला हात पण लावला नाही. त्यांचा हा गांधीगिरीचा भाग होता असं ऐकलं. परंतु यापूर्वी गांधीगिरीची बेईज्जती झाली नव्हती ती त्याठिकाणी घडली आहे.

बिलावर हवी तशी चर्चा होवू शकली नाही म्हणजे होवू दिली नाही. आवाजी मताने बिलं मंजूर करण्याची वेळ आताच का आलीय, असा सवालही शरद पवार यांनी केला.  कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा उत्पादन यावर बोलतानाच देशभरातील शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे त्याला आमचा नक्की पाठिंबा असेल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी सांगितले.

Protected Content