आरोग्य खात्याचा ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर भर

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी ड्युरा सिलेंडर आणि क्रायो टँक खरेदीसाठी २२७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून याला आरोग्य खात्याने मंजूरी दिली आहे.

 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेमध्ये रुग्णांची आणि पर्यायाने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ऑक्सिजनच्या मुबलक साठयासाठी आवश्यक डयुरा सिलिंडर व क्रायो टँकच्या खरेदीसाठी तब्बल २२७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पूर्वतयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्तरावर मध्यंतरी बैठक आयोजित केली होती. कोरोनाच्या दुस़र्‍या लाटेत राज्यातील सर्व जिह्यांत आवश्यक असलेली कमाल ऑक्सिजनची गरज व कमाल रुग्णसंख्या विचारात घेण्यात आली. त्या तुलनेत २५ टक्के रुग्णवाढ लक्षात घेऊन यापूर्वी लागलेल्या ऑक्सिजनच्या गरजेपेक्षा तीन पट अधिक ऑक्सिजनच्या पूर्वतयारीच्या सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत. मागील लाटेत ऑक्सिजनचा साठा व वाहतूक करण्यासाठी टँकरची संख्या कमी पडली होती. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता प्रत्येकी ३०० लिटर क्षमतेचे ३ हजार ७९८ डयुरा सिलिंडर व प्रत्येकी २० किलो लिटर क्षमतेचे २२६ क्रायो टँक खरेदी करण्यास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने  मान्यता दिली आहे.

 

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अत्युच्च शिखरावर होता तेव्हा दरोज १ हजार ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. आता ऑक्सिजनची क्षमता दोन हजार मेट्रिक टनची आहे. पण तिसऱया लाटेत दररोज चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सण उत्सव लक्षात घेता केंद्र सरकारने दिलेल्या इशाऱयानुसार राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.

Protected Content