जयपूर: : वृत्तसंस्था । आयकर विभागाने राजस्थानात जयपूरमध्ये सराफा व्यापारी, दोन रियल इस्टेट डेव्हल्परच्या कार्यालय आणि घरी धाडी मारून पावणे दोन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत.
एका सराफा व्यापाऱ्याच्या घरात तर तळघर सापडले असून त्यात ७०० कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाने राजस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठी रेड टाकून हा कुबेराचा खजिना शोधून काढला आहे. आयकर विभागानं टाकेलल्या छाप्यांची कारवाई सलग ५ दिवस सुरु होती. आयकर विभागानं सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयांवर आणि घरी छापे टाकले. या छाप्यांमध्ये सराफ व्यावसायिकाकडे तळघर मिळाले. यामध्ये ७०० कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईत ५० टीम सहभागी झाल्या होत्या. एका टीममध्ये ४ सदस्य असे एकूण २०० कर्मचारी कार्यरत होते. ५ दिवस चाललेल्या कारवाईत हजारो कागदपत्रं आणि दस्त तपासण्यात आले.
आयकर विभागाच्या माहितीनुसार हे छापे जयपूरमधील तीन मोठ्या समुहांवर टाकण्यात आले. सिल्वर आर्टग्रुप, चोराडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये १७५० कोटी रुपयांच्या काळा पैशाच्या कमाईचा भांडाफोड झाला आहे.
सराफाच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. तिथे एका ठिकाणी तळघर आढळून आले. त्यामध्ये मूर्ती, किमती खडे, दागिने सापडले, त्याची किमंत अंदाजे ७०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार तीन उद्योगांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यामध्ये २०० कोटींच्या व्यवहारांची कागदपत्रं आढळून आली आहेत. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त करण्यात आलं आहे. कारवाईत सापडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.