चाळीसगाव : प्रतिनिधी । मी शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्यांवर आलेल्या दुर्दैवी वेळेत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते परंतु उलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार्यांना अटक होत असल्याची खंत व्यक्त करीत नगरसेविका विजया पवार यांनी शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक पदाचा राजीनामा दिला आहे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक विचारांनी व आंदोलनांनी प्रेरित होऊन व शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी काम करणारी संघटना म्हणून मी शिवसेनेचे काम सुरु केले. मी देखील शेतकऱ्याची मुलगी,पत्नी व बहिण आहे. आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना झालेल्या अटकेमुळे मी व्यथित झाले आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया या अटकेमुळे चाळीसगाव तालुक्यातून येत आहेत. शिवसेनेचे सरकार असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शिवसेनेच्या पदावर राहण्याच्या नैतिक अधिकार मला एक शेतकरी कन्या म्हणून नाही , असे त्या म्हणाल्या .
शेतकऱ्यांसाठी झटणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो त्याच्या पाठीमागे शेतकरी कन्या म्हणून ठाम उभे राहणे मला योग्य वाटते आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठींबा म्हणून मी शिवसेना चाळीसगाव तालुका महिला आघाडी संघटक पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र नगरसेविका विजया पवार यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या रणरागिणीने घेतलेल्या या शेतकरी हिताच्या भूमिकेचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वागत होत असून सत्तेत आल्यानंतर शेतकरी हित विसरणाऱ्या राजकीय पक्षांसाठी ही चपराक मानली जात आहे.
नगरसेविका सौ.विजया पवार यांनी राजीनामा पत्रात अनेक विषय नमूद करत आपली नाराजी व्यक्त केली आहे, त्या लिहितात की, मागील काळात भाजपबरोबर सत्तेत असूनदेखील शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उचलला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतीचे आश्वासन दिले. तदनंतर भाजपची सत्ता जाऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले.आता शेतकऱ्यांच्या समस्या संपून त्यांना चांगले दिवस येतील, नुकसानीची मदत मिळेल, नियमित वीज मिळून शेतीला पाणी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र आज याउलट परिस्थिती राज्यात दिसत आहे.
महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी व कॉंग्रेसमुळे कदाचित मुख्यमंत्री यांना शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला अडचणी येत असतील अशी शंका येते,कारण उर्जा खाते कॉंग्रेस पक्षाकडे आहे मात्र आज चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी गारपीट व वादळी पावसामुळे अडचणीत असताना व त्यांच्या उभ्या पिकांना शेवटचे एकदोन पाणी देणे बाकी असताना जवळपास ७ हजार वीज जोडण्या कट करण्यात आल्या. भाजपासोबत सत्तेत असताना कधीच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही. याचा निषेध म्हणून संतप्त झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आमदार मंगेश चव्हाण वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांना जळगाव येथे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्याला दोरीने बांधून निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या भावना वीज वितरण कंपनी व महाविकास आघाडी सरकारने समजून घेण्याएवजी उलट आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना अटक केली.
माझ्याकडे शिवसेना महिला संघटक म्हणून चाळीसगाव तालुक्याची जबाबदारी आहे. शिवसेना पक्षाने देखील यापूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी आक्रमकपणे आंदोलन केली आहेत मात्र आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही. मला शेकडो शेतकऱ्यांचे फोन आलेत कि आमदारांनी जे केले ते योग्य आहे कारण आज शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत.त्यांची आज वीजबिले भरण्याची परिस्थिती नाही. शेतकऱ्यांना शासनाने काही काळ संधी दिली पाहिजे होती.
आमदारांनी व शेतकऱ्यांनी आक्रमकपणे प्रश्नांसाठी जाब विचारणे गुंडागर्दी असेल तर कुठलीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे ही वीज वितरण कंपनीची गुंडागर्दी नाही का ? सक्तीची वसुली राज्यात आजपर्यंत बघायला मिळाली नसल्याने मी शिवसेना महिला आघाडी चाळीसगाव तालुका संघटक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे.