नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । “कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा,” असं म्हणत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर मोदी सरकारच्या तीन कृषी विधेयकांचं कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, त्याचे पडसाद उटताना दिसत आहे. शेतकरी आक्रमक झालेले असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. राज्यसभेत ही विधेयकं मंजुर करताना गोंधळ झाला होता. त्यावर उपसभापतींनी विरोधक जागेवर बसले नव्हते, असा दावा केला होता. या दाव्याचं खंडन करणार वृत्त ट्विट करत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने राज्यसभा टिव्हीच्या चित्रफितीवरून विशेष वृत्त प्रसिद्ध केलं असून, त्यात मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. देशात शेतकऱ्यांकडून नव्या कृषी कायद्यांना विरोध होत आहे. दिल्लीतील इंडिया गेट परिसरात सकाळी ट्रॅक्टर जाळल्याची घटना घडली असून, आंदोलन हिंसक होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरयाणात सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता आहे.

Protected Content