महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नका ; अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावलं

 

मुंबई: वृत्तसंस्था । अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले, अशी टिप्पणी करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. कोणत्याही नेत्याने महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नये, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले

 

अनिल देशमुख यांनी स्वत: याबाबत भाष्य करण्याचे टाळले असले तरी नवाब मलिक आणि अजित पवार यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.

 

ते रविवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकासआघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक या सदरात नमूद केले होते.

Protected Content