नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार : टोपे यांचे संकेत

अहमदनगर । राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातचं आता नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. 

करोना विषाणूचा देशात सर्वार्थाने सर्वाधिक फटका राज्याला बसला. अजूनही करोनावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत करोनासोबतच जगावे लागेल. लॉकडाऊनमुळे राज्यातील अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी आता येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र संपूर्ण अनलॉक करावाच लागेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

जालनाकडे जाताना टोपे काही काळ नगरमधील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे व व्यायामशाळा उघडण्यासंदर्भात राज्य सरकार आता अनुकूल आहे. त्याची नियमावली ठरविण्यात येत असून, येत्या नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ते सुरू करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

करोना चाचणीसाठी आरटीपीसीआरच्या टेस्ट करण्यास केंद्र सरकारने साडेचार हजार रुपयांचे शुल्क ठरविले. तथापि, त्यातही कपात करुन हा दर केवळ 800 रुपयांपर्यंत खाली आणण्याचा राज्य सरकाराचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Protected Content