पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा व जामनेर येथील फळरोप वाटीकेतील १६ महिला कामगारांना डिसेंबर २०१९ पासुन मानधन मिळत नसल्याने या महिला भारतीय मजदुर संघ, जळगावचे जिल्हा अध्यक्ष पी. जे. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पाचोरा तहसिलदार कार्यालया समोर उपोषणास बसल्या होत्या. आमदार किशोर पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे व कृषी सचिव एकनाथ ढवले यांचेशी चर्चा करुन येत्या गुरुवारी ८ ते १० लाख रुपये महिलांना मानधन देण्यात येणार असल्याचे कबुल केल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे हस्ते महिलांनी नारळ पाणी घेवुन उपोषणाची सांगता केली.
पाचोरा येथील उपविभागीय कृषी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पाचोरा येथील मिराबाई रमेश कोळी, बेबाबाई शिवाजी पाटील, सुरेखाबाई राजु चौधरी, चंद्रकला दिनकर पाटील, सोनाबाई नारायण चौधरी, दुर्गाबाई जनार्दन शिंदे, लिलाबाई पुंडलिक पाटील, वत्सलाबाई निळकंठ कोळी सह राजु बाबुराव खराडे व अरुण शिवाजी यादव आणि जामनेर येथील अहिल्याबाई वामन तायडे, द्वारकाबाई रामराव गायकवाड, आशाबाई नारायण पोळ, निर्मलाबाई किसन वराडे, रुख्माबाई मारोती झाल्टे, कौशल्याबाई एकनाथ बाविस्कर या १६ महिला २७ जानेवारी पासून साखळी उपोषण तर ३० जानेवारी पासून त्यांना १४ महिन्यांचा पगार न मिळाल्याने पाचोरा येथील तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या होत्या. सदर महिलांना यापुर्वी न्याय न मिळाल्याने त्या तिसऱ्यांदा उपोषणास बसल्या होत्या. उपोषणाकर्त्या महिलांचे कृषी विभागाकडे सुमारे १६ लाख रुपये मानधन थकीत आहे. उपोषणाकर्त्या महिलांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पालिकेचे कर निरीक्षक तथा मजदुर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष धनराज पाटील यांनी भेट दिली होती. तर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर यांनी पाठींबा दर्शविला होता. अखेर रविवारी आमदार किशोर पाटील यांनी कृषीमंत्री दाद भुसे, कृषी सचिव एकनाथ ढवले यांना पत्र पाठवुन व प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन येत्या गुरुवारी थकीत १६ लाख रुपये पैकी ८ ते १० लाख रुपये मानधन अदा करण्याचे कबुल केल्याचे आश्र्वासन दिल्यानंतर महिलांनी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी घेवुन उपोषण सोडले. यावेळी युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, गणेश पाटील, पप्पु राजपुत, प्रविण ब्राम्हणे, पी. जे. पाटील उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/168120964801221