अंजनी धरण ओव्हरफ्लो : घरांसह पिकांचे प्रचंड नुकसान

Anjani nadi news

एरंडोल प्रतिनिधी । अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावामध्ये पाणी शिरले आहे. 80 टक्के भरल्यामुळे बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास अंजनी धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले. मात्र 4 वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरूच होता. ग्रामस्थांनी तालुका प्रशासकीय संपर्क साधला असताना प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना माळी, पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात तात्काळ यावर उपाययोजना केल्यात.

याबाबत अधिक माहिती अशी की, कासोदा परिसरात १०२ मि.मी. पावसामुळे अतिवृष्टी नोंद करण्यात आली आहे. धुंवाधार पावसामुळे अंजनी नदीला आलेला पुर आल्याने हनमंत खेडे, मजरे, सोनबर्डी, नांदखुर्द ब. नांदखुर्द या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तर परिसरातील काही भागामध्ये जसे कासोदा, आडगाव, तळई, फरकांडे, उमरे या गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कुंटुबाला वाचविण्यात यश

याचबरोबर, एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहा समोरील पवारा आदिवासी लोकांच्या झोपड्या पुरात वाहुन गेल्यामुळे २० ते २५ परिवार बेघर झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी न.पा.प्रशासन व सेवाभावी संस्था यांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून नगर पालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही प्रतिष्ठितांनी प्रत्यक्ष जाऊन या आदिवासी कुटूंबाना घर खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. यात झोपडपट्टीतील एका प्रेमराज रामसिंग बारेला यांचे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले. त्या परिवारातील पाच सदस्यांनी 3 ते 4 तास एका काटेरी झाडाचा आधार घेत पाण्याशी संघर्ष केला. याचबरोबर त्यांना काही युवकांनी व नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी मदत कार्य करत दोरीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये मुकेश बारेला, दुर्गाबाई बारेला, रामाबाई बारेला, प्रेमलाल बारेला तर दुस-या झाडावर सीताराम बारेला हा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत होता. त्यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

अंजनी धरणाला लागुन असलेल्या काळा बांधा-या नजीकच्या शेतामध्ये पाणी प्रवाहीत झाल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहे. एरंडोल येथे पाच जणांचे प्राण वाचले. जळू जवळील चंदनबर्डी येथील भीमसिंग भुना सोनवणे (वय-५३) हा व्यक्ती सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला असतांना गावात आलेल्या पुरात वाहुन गेला. भिमसिंग यांच्या मृतदेह एक किलोमीटर अंतरावरील हनुमंतखेडे गावाजवळ झुडुपात सापडला. त्याचे शवविच्छेदन कसोदा प्रा.आरोग्य केंद्रात करण्यात आले.

आठवडे बाजार परिसरातील पुरातन महादेव मंदिराला ४० वर्षानंतर पुराच्या पाण्याने वेढा पडला होता. आठवडे बाजार व बुधवार दरवाज्या समोरचा रस्ता अंजनी नदीचा प्रवाह बनला व त्याच्या काठावर असलेलं मटण मार्केट जवळील घरांमध्ये पाणी घुसून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ४० वर्षानंतर अंजनी नदीला मोठा पुर आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. गुरुवारी दुपारी अंजनी धरणाच्या तीन पैकी एका गेटची दुरुस्ती करण्यात आली.

म्हसावद रस्त्यावरील जुन्या फरशीला तडे गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.स्मशानभूमीची संरक्षक भिंत,कासोदा दरवाज्या नजीकची भिंत,आठवडे बाजारा नजीकची संरक्षक भिंत अंशतः कोसळल्यामुळे हानी झाली आहे.

Protected Content