वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रकक्ष सुरू

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रशल्यचिकित्सा कक्ष बुधवार दि. २७ जानेवारीपासून खुला करण्यात आला असून पहिल्या दिवशी मोतीबिंदूच्या दोन शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. ज्यांना नेत्र शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांनी संपर्क करावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या साथीमुळे गेल्या १० महिन्यांपासून नेत्रकक्ष बंद होता. रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते. आता १७ डिसेंबर २०२० पासून कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधींवर उपचार सुरु झाल्यानंतर ओपीडीतील नेत्र कक्ष देखील अद्ययावत सुरु झालेला आहे. आता महाविद्यालय परिसरात असलेला नेत्र कक्ष हा विभाग मात्र कोरोनावरील उपचारासाठी असल्याने बंद होता. आता या विभागाचे पूर्णतः निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तेथे शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्यात आला आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयात ३५ जणांची नोंदणी झाली आहे. बुधवारी २७ जानेवारी रोंजी जवाहर रामदास कुलकर्णी (वय ६८), रा. रावेर यांच्यावर पहिली, त्यानंतर जामनेर तालुक्यातील नेरी येथील यशोदाबाई शामलाल कुमावत (वय ६०) यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. यापूर्वी दोघांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर या शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम समन्वयक डॉ.यु. बी. तासखेडकर यांचे मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख व नेत्रशल्य चिकित्सक डॉ. प्रसन्ना पाटील यांनी केल्या. त्यांना डॉ. अंजली सिंग, डॉ. प्रवीण पाटील, परिचारिका वॊर्ड इन्चार्ज जयश्री जोगी, कल्पना विकवाडे, निशा गाढे, शस्त्रक्रियागर सहाय्यक उमेश वेल्हाळ यांनी सहकार्य केले.

गुरुवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, अधिसेविका कविता नेतकर यांनी नेत्रकक्षाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी कक्षातील डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका उपस्थित होत्या.

 जिल्ह्यातील ज्या नागरिकांना डोळ्यांचे मोतीबिंदू, नासूर, काचबिंदू आदी शस्त्रक्रिया करायच्या असतील त्यांनी ओपीडी काळात सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान कक्ष क्रमांक १०३ येथे तपासणी करून नाव नोंदणी करावी असे आवाहन नेत्रशल्यचिकित्सा विभागातर्फे करण्यात आले आहे.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आवाहन केले आहे की, रुग्णालयाला प्रतीक्षा असलेला नेत्रकक्ष सुरु झाला असून नागरिकांनी लाभ घ्यावा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत आहे. ज्यांना आर्थिक अडचण आहे, अशांना इतर नेत्र शस्त्रक्रिया ह्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे करता येऊ शकतात. त्यासाठी रुग्णालयातील जनसंपर्क कक्षाशी संपर्क साधावा.

Protected Content