आमच्या विनंतीमुळेच मुख्यमंत्री घरातून काम पाहतात – शरद पवार

उस्मानाबाद: वृत्तसंस्था । वेगवेगळे प्रश्न असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. लोकांना भेटत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , ‘आमच्या विनंतीमुळेच मुख्यमंत्री घरी राहून कामकाज करत आहेत,’

लॉकडाऊन काळात विरोधी पक्षाचे नेते व सरकारमधील अन्य मंत्री राज्यभर फिरत होते. मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र क्वचितच बाहेर पडलेले दिसले. बहुतेक कामकाज ते घरातूनच करत आहेत. अनेक कोविड सेंटरची उद्घाटने मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केली. अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी व समाजातील अन्य घटकांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सतत टीकेची झोड उठवली. घरात बसून राहणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांना हिणवले गेले. परतीच्या पावसाने राज्यभरात झालेल्या नुकसानीनंतर विरोधकांची टीकेची धार वाढली होती.

या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. ‘प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्या हातात असते, त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं, असं पवार म्हणाले. करोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच राहावे व सर्व जिल्ह्यांच्या संपर्कात राहून निर्णय घ्यावेत, अशी विनंती आम्ही केली होती. आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्वीकारली,’ असं पवार म्हणाले. ‘आम्ही सर्वजण राज्यात फिरून त्यांना परिस्थितीची माहिती देत असतो,’ असंही त्यांनी सांगितलं.

संकटाच्या काळात शरद पवार प्रत्येक ठिकाणी दिसतात. लोकांशी संवाद साधतात. याबद्दल विचारलं असता पवार म्हणाले, ‘राज्यातील जनता प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळं त्यांच्यावर संकट आलं असताना मी शांत बसू शकत नाही. गेल्या ५३ वर्षांत मी विधानसभा, लोकसभा व राज्यसभा अशा वेगवेगळ्या सभागृहांमध्ये काम केलं. त्या काळात लोकांनी मला एकही सुट्टी दिली नाही,’ असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

Protected Content