पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी; शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालघर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीमधील तिढा अखेर सुटला आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत पालघरच्या जागेवरून मोठी रस्सीखेच सुरू होती. एक महिन्यापूर्वी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यादृष्टीनं गावित यांनी प्रचारही सुरू केला. पण, या निर्णयाला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी उघड विरोध केला होता. त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही जागा पक्षाला मिळण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा पवित्रा घेतला होता.

अखेर भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेतल्यानं शिवसेनेवर पालघरची जागा सोडण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉ. हेमंत हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. माजी मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळविले. त्याबदल्यात त्यांना महायुतीत पालघरची जागा भाजपला सोडावी लागली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला आहे. डॉ. हेमंत सावरा यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी यांच्यासोबत होणार आहे.

Protected Content