ट्रान्सफॉर्मर उद्घाटनासाठी राज्यमंत्री दुचाकीने आदिवासी पाड्यावर

अहमदनगर: वृत्तसंस्था । दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावरील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे थेट अरुंद रस्त्यावरून दुचाकीवर तेथे पोहोचले.

या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे हे उद्घाटन खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेल्याच्या भावनाही तनपुरे यांनी ट्वीट करीत व्यक्त केल्या आहेत.

राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे तेथील नागरिकांच्या नशिबी कायमच अंधार असल्याचे चित्र होते. वीज नसल्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता येथे वीज पोहोचवण्यात राज्य सरकारला यश आले असून तेथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. हा अनुभवच मंत्री तनपुरे यांनी ट्विटवर शेअर केला आहे.

तनपुरे यांनी म्हटलय, ‘बोंबलदरा, अगदी कमी वस्ती असलेला माझ्या आदिवासी बांधवांचा पाडा. राहुरी-संगमनेर सीमेवर, दूरवर जंगलात वसलेल्या या आदिवासी वस्तीवर दुर्दैवाने अद्याप वीज पोहोचली नव्हती. आज मी स्वतः अरुंद वाटेवरून मोटारसायकलने प्रवास करत येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले. मंत्री झाल्यापासून बरीच उद्घाटनं केली. मात्र बोंबलदरा येथील माझ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आज जो प्रकाश पडला आहे. तो मला मोलाचा वाटतो. त्या लख्य प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला खऱ्या अर्थाने समाधान देऊन गेला.

Protected Content